पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ   

सरकारकडून निधीचा पुरवठा 

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या अचूक लष्करी हल्ल्यांदरम्यान उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण शिबिरे पाकिस्तानने पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे. या पुनर्बांधणीला पाकिस्तानी लष्कर, त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय आणि सरकारचा पाठिंबा असल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. भारताच्या देखरेखीपासून आणि भविष्यातील हल्ल्यांपासून वाचण्यासाठी व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील जंगली भागात लहान आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज तळ उभारत आहे.  

लहान तुकड्यांसाठी तळ 

यापूर्वी अनेक दहशतवाद्यांना एकाच छताखाली प्रशिक्षण दिले जात होते. आता २० ते ३० दहशतवाद्यांच्या लहान तुकड्यांसाठी व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा बांधले जात आहेत. लुनी, पुटवाल, टिपू पोस्ट, जमील पोस्ट, उमरानवाली आणि जंगलोरा यासारख्या भारतीय हल्ल्यांनी प्रभावित झालेल्या ठिकाणांवर तळ पुनर्बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. केल, सार्डी, दुधनियाल, अथमुकाम, जुरा, लिपा, पचिबान, कहुता, कोटली, खुईरट्टा, मंधार, निकैल, चमनकोट आणि जानकोट यासारख्या ठिकाणी नवीन तळ उभारणी सुरू आहे. ही ठिकाणे जंगले आणि लहान पर्वतांनी वेढलेली आहेत. त्यामुळे तिथे दहशतवाद्यांना लपविणे आणि त्यांना दीर्घकाळ ठेवणे सोपे आहे.

आयएसआयची नवी व्यूहरचना

आंतरराष्ट्रीय सीमेवर आयएसआयकडून नवी रणनीती आखली जात आहे.आयएसआय मोठ्या दहशतवादी तळांना लहान छावण्यांमध्ये विभाजित करत आहे. ही रणनीती दहशतवाद्यांना पसरवण्यासाठी आहे, जेणेकरून जर एका तळावर हल्ला झाला तर इतरांवर परिणाम होणार नाही. या प्रत्येक लहान तळाची स्वतःची सुरक्षा व्यवस्था असेल. विशेष प्रशिक्षित पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी थर्मल सेन्सर्स, कमी-फ्रिक्वेन्सी रडार आणि ड्रोनविरोधी प्रणाली वापरून या तळांचे रक्षण करतील.

बहावलपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक

अलीकडेच बहावलपूरमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गुप्त बैठकीतील संदेश भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळवला होता. यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि द रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचे वरिष्ठ नेते आयएसआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह उपस्थित होते. या बैठकीत आयएसआयने दहशतवादी तळांची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मनुष्यबळ मदतीचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. या बैठकीत दहशतवादी पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी आणि पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये भरती प्रक्रियेला गती देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. 

४० कोटींचा निधी 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वत: हस्तक्षेप करून दहशतवादी तळांच्या दुरूस्तीसाठी सरकारकडून ४० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. बहावलपूरमधील जैशच्या तळाच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा बालेकिल्ला असलेल्या मुरीदके  येथील तळासाठी १५ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या उद्ध्वस्त प्रशिक्षण तळासाठी ११ कोटी रुपये देण्यात आले आहेत. निधी मिळाल्यानंतर या ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे. भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली घरे आणि मशिदीही पाकिस्तान सरकार बांधून देणार आहे. 

तळ दुरूस्तीसाठी अंतिम मुदत 

असीम मुनीर यांनी अलिकडेच बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह कॉम्प्लेक्ससह प्रमुख तळांच्या पुनर्बांधणीसाठी कंत्राटदारांना आजपर्यंतची (३० जून) अंतिम मुदत दिली आहे. या कामावर लक्ष्य ठेवण्यासाठी मुनीर यांनी एक पथक तयार केले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना किती पाठिंबा देतो याचा हा मोठा पुरावा आहे.

आंतरराष्ट्रीय मदतीचा गैरवापर  

जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानला मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीचा काही भाग या दहशतवादी छावण्यांच्या पुनर्रचनासाठी वळवला जात असल्याचा आरोप होत आहे. महिला समावेशक वित्त क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत महिलांच्या आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानने आशियाई विकास बँकेकडून ३५० दशलक्ष कर्ज मिळवले आहे. देशाला सिंडिकेटेड कर्ज आणि व्यावसायिक कर्जाच्या पुनर्वित्तीकरणाद्वारे चिनी बँकांकडून अतिरिक्त ३.३ अब्ज परदेशी कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.
 

Related Articles