पुण्यात आज पालख्यांचे आगमन   

स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विठ्ठल मंदिरांत तयारी; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (शुक्रवारी) पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिर (नाना पेठ) या मंदिरातील पालखी सोहळ्यानिमित्तची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. विद्युत रोषणाईने मंदिरे उजळली आहेत. मंदिरांच्या विश्वस्तांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे. तसेच संस्था-संघटनांकडूनही सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. भक्तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकर अतुर झाले आहेत.
 
आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिरात आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे. दोन्ही पालख्यांमधील दिंडीतील वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, मंदिरांमध्ये फुलांची सजावट, उत्सव मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. तर विद्युत रोषणाईने दोन्ही मंदिरे उजळली आहेत. दोन्ही मंदिरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्तही असणार आहे. सुरक्षेसाठी मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) सायंकाळी मंदिरांमध्ये पालख्यांचे आगमन झाल्यानंतर विश्वस्तांकडून स्वागत करण्यात येणार आहे.
 
भवानी पेठ आणि नाना पेठेतील मंदिरात पालख्या स्थिरावल्यानंतर भक्तांना पालख्यांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वारकरी मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. याविषयी भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, तयारी पूर्ण झाली आहे. विश्वस्त मंडळाच्या वतीने पालखीचे आज स्वागत होणार आहे. पालखी आगमनानंतर अभिषेक, पूजा, आरती होईल.

शहरात भक्तिमय वातावरण 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज आगमन होणार आहे. पालखी सोहळ्यामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. मध्यवर्ती पेठांसह ठिकठिकाणी पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. संस्था-संघटनांतर्फे आरोग्य, नेत्र, दंत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर वारकर्‍यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त वारकर्‍यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. त्यात अभंग गायन, भजन-कीर्तन, सांगीतिक मैफलींचा समावेश आहे.

धार्मिक उपक्रमांचे आयोजन 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करणार आहेत. सायंकाळी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर पादुका पूजन झाल्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर पालखीचा मंदिराच्या आत प्रवेश होईल, आरती झाल्यावर संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दिंडीतील वारकर्‍यांची निवासाची आणि भोजनाची सोय केली आहे. विविध धार्मिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. 

- आनंद पाध्ये, व्यवस्थापक, श्री निवडुंगा विठोबा मंदिर.

 

Related Articles