पालखी मार्गावर साचले पाणी   

महापालिकेच्या स्वागत कक्ष समोरचा रस्ता बनला जलमय

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला. दरम्यान, संततधार पावसामुळे पालखी मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. देहू ते आकुर्डी या दरम्यान पालखी मार्गावर रस्त्याच्या कडेला तसेच मधोमध मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पालखीसोबत चालणार्‍या दिंडी आणि वारकर्‍यांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. 
 
निगडी येथील महापालिकेच्या आणि पोलिस मदत केंद्राच्या कक्षासमोरच पाण्याचे पाट वाहत होते. त्यामुळे या पाण्यातून वाट काढत वारकर्‍यांना पुढे जावे लागले. पाण्याबरोबर चिखल देखील आल्याने पालखीसोबत चालणार्‍या वारकर्‍यांचे कपडे खराब होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वारकरी प्लास्टिकच्या पिशव्या पायाला अडकवून पुढे जात असल्याचे चित्र दिसत होते. 
 
पालखी मार्गावर साचलेल्या पाण्यामध्ये कचरा, वाटप झालेल्या केळीची साले, रिकामे कप, बाटल्या प्रवाहात वाहून महापालिकेच्या कक्षासमोर आल्या होत्या. त्यामुळे येथे तैनात असलेल्या आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. 
 
आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, पावसाचे प्रमाण मोठे असल्यामुळे पाणी वाहत याठिकाणी आले आहे. तसेच, निगडी ते आकुर्डी दरम्यान मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू असल्यामुळे देखील पालखी मार्गावर जागोजागी पाणी साचले.
 

Related Articles