थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण   

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट डमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने साडेतेरा फुट उंचीचा हा पुतळा आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.
 
श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही. ४० वर्षांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी ठरेल, अशी भावना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.

Related Articles