नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)   

राजकीय पक्ष एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर एकत्र येतात; पण त्यांचे दीर्घकालीन ध्येय आणि विचारधारा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे तात्पुरती युती ही केवळ त्यांच्या राजकीय डावपेचाचा एक भाग असू शकतो.
 
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राज्यात वातावरण तापले आहे. या निर्णयास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला असून, या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? या विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमच्यातील वाद मोठे नाहीत, असे वक्तव्य केल्याने आता आपसातील मतभेद संपवून हे दोघे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या सभेतही उद्धव यांनी याबाबतीत सकारात्मकता दाखवल्याने त्यावर चर्चा सुरू राहिल्या; मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांच्या काही परस्पर विरोधी भूमिकामुळे यावर कितपत विश्वास ठेवायचा? असा प्रश्न पडतो. येत्या ५ तारखेला हिंदीच्या सक्ती विरोधात निघणार्‍या मोर्चाचे नेतृत्व मनसेकडे राहील, हे उघड असले तरी या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. आधी उद्धव ठाकरे यांनीही ७ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्यातही एकवाक्यता नसल्याचे चित्र समोर आले होते. या चर्चांना पोषक अशा घडामोडी पडद्यामागे घडत असल्याची माहिती समोर येत असली तरी हे दोन्ही ठाकरे बंधू आपले अहंकार बाजूला सारून खरोखरीच एकत्र येतील का? हा खरा प्रश्न आहे. या मोर्चाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आल्यास आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा फरक पडू शकेल. शिवाय महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याचे परिणाम पाहायला मिळतील; मात्र राज यांची धरसोड वृत्ती आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी घेतलेल्या उलटसुलट भूमिका यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. उद्धव यांचा अहंकारही त्यांच्या एकत्र येण्यावर मर्यादा आणू शकतो.
 
अडथळे अनेक
 
राज आणि उद्धव यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या सकारात्मक विधानामुळे या चर्चेला अधिक बळ मिळत आहे. महाराष्ट्राचे हित आणि मराठी माणूस या मुद्द्यावर दोघांनीही अनुकूलता दर्शवली आहे. आमचे वाद किरकोळ आहेत, महाराष्ट्राच्या हितापुढे ते गौण आहेत असे राज यांनी म्हटले त्यावर उद्धव यांनीही महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते घडेल अशा शब्दांत त्यास दुजोरा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. विशेषतः महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला आव्हान देण्यासाठी एकत्र येणे दोघांनाही लाभदायक ठरू शकते. काळाची गरज लक्षात घेऊन दोन्ही नेते नरमाईच्या भूमिकेत आले असावेत. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना आणि ‘मातोश्री’ सोडल्यापासून दोन्ही भावांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला होता. हा भूतकाळ पूर्णतः विसरून एकत्र येणे हे दोघांसाठी आव्हान ठरू शकते. राज यांनी या आधीच्या निवडणुकांत भाजपची पाठराखण केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, दोघांच्या भेटीगाठी होत असतात. यामुळे भविष्यात भाजपशी त्यांचे संबंध कसे राहतील यावरही हे दोघे एकत्र येणे अवलंबून राहील. सध्यातरी उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. राज यांनी जाहीर केलेला ५ जुलैचा मोर्चा हे दोघांना एकत्र आणण्यासाठी एक निमित्त ठरू शकते. मराठी अस्मितेचा मुद्दा दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर ते एकत्र येणे अशक्य नाही. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हा दोघांच्याही विचारधारेचा समान धागा आहे; मात्र त्यांच्या पक्षांच्या विलीनीकरणात नेतृत्व कोणाचे हा मुद्दा कळीचा ठरू शकतो. राज ठाकरे यांनी नेहमीच स्वतंत्र भूमिका घेतली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे लक्षात घेतले तर काहीही होऊ शकते. ठाकरे बंधूंनी एकमेकांवर याआधी केलेली टीका एकत्र येण्यात अडथळा ठरू शकते. हा अडथळा भावनिक आणि मानसिक स्वरूपाचा असला तरी राजकीय परिस्थितीची गरज आणि समान उद्दिष्टे त्यावर मात करू शकतात. दोघांच्या एकत्र येण्यात अडथळे आहेत; मात्र त्यांच्यातील राजकीय परिपक्वता आणि भविष्यातील दूरदृष्टी यावरच ते या अडथळ्यांवर कसे मात करू शकतात हे अवलंबून आहे.

Related Articles