जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद   

वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा निषेध

पुणे : वाहतूक पोलिसांकडून माल वाहतूक करणार्‍या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले, तसेच औषधांची वाहतूक करणार्‍या मालमोटारी १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवणार असल्याचा इशारा दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिला आहे.
 
शहराच्या मध्यभागात असलेल्या नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठेतील भुसार बाजार, तसेच मार्केट यार्डातील भुसार बाजारात अन्नधान्य वाहतूक करणार्‍या ट्रक, टेम्पोवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर जड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले, तसेच औषधांची वाहतूक करणारी वाहने बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा दि पूना डिस्ट्रिक्ट  मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिला आहे.
 
याबाबत दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनची सभा नुकतीच झाली. याबाबत त्यांनी व्यापारी संघटनांना पत्र दिले आहे. शहरातील गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवर दिवसा जड वाहनांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निर्बंधामुळे पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाववाढ होऊन त्याची झळ सामन्यांना सोसावी लागणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय करणारे व्यावसायीक, हमाल कामगार तसेच अन्य घटकांवर परिणाम होणार आहे.
 
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या गाड्यांना सूट देण्यात यावी. हा प्रश्न तातडीने मार्गी लावणे, तसेच वाहतूकदारांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, कृषी उपन्न बाजार समितीतील अधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. याप्रश्नी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापार्‍यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी केली आहे.

Related Articles