भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात   

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतील विजेत्या संघाला आता अँडरसन-तेंडुलकर या दोन दिग्गजांच्या नावाने चषक दिला जाणार आहे. इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासह बीसीसीआयने अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे. आजपासून भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. लीड्सच्या मैदानात रंगणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याआधी सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांचे ट्रॉफीसह खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.
 
आता भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ही या दोन दिग्गजांच्या नावाने ओळखली जाईल. २००७ पासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ही पतौडी ट्रॉफी अंतर्गत खेळवण्यात येत होती. पण यंदाच्या हंगामात इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने या द्विपक्षीय कसोटी मालिकेला आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांचे ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर करत द्विपक्षीय मालिकेतील ट्रॉफीचे नाव बदलल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ट्रॉफीसह मालिका विजेत्या कर्णधाराला पतौडी मेडल देत भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पतौडी कुटुंबियाच्या नावाचा वारसाही जपला जाणार आहे.
 
नव्या ट्रॉफीच्या अनावरण केल्यावर जेम्स अँडरसन म्हणाला आहे की, हा माझ्यासह कुटुंबियांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या मालिकेत रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. आगामी मालिकेत इंग्लंडचा संघाची सर्वोत्तम कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक आहे. कसोटी क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. क्रिकेटमधील हा एक सर्वोत्तम प्रकार असून चूक झाल्यावर त्यातून बाहेर पडण्याची दुसरी संधी तुम्हाला इथं मिळते. कसोटी ही सहनशीलता, शिस्त अन् अनुकूलता याचीही शिकवण देऊन जाते. कसोटी क्रिकेटमुळेच माझा पाया भक्कम झाला, अशा आशयाच्या शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधील अविश्वसनीय यशात कसोटी क्रिकेटचा वाटा मोलाचा असल्याचे म्हटले आहे.
 

Related Articles