इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बदलले पतौडी चषकाचे नाव : सचिन तेंडूलकर   

लंडन : भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कायमच क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे. तो निवृत्त होऊन अनेक वर्षे होऊन गेली तरीही त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. आजही सचिनच्या खेळीची आणि त्याच्या विक्रमांची सर इतर कुणालाही नसल्याचे चाहते आवर्जून सांगतात. पण गेल्या काही दिवसात सचिन तेंडुलकरचे नाव नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आले होते. भारतीय संघ आजपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी होते. ते आता बदलून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. या निर्णयावर भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर सचिन तेंडुलकरने या मुद्द्यावर मौन सोडले आहे.
 
सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले, आज मी स्पष्टच बोलतो. या चषकाचे जुने नाव कालबाह्य ठरवून नवीन देण्याचा निर्णय या सर्वस्वी बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा होता. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो मला कळवला. पतौडी कुटुंबाबाबत बोलायचे झाल्यास, मला त्यांचे भारतीय क्रिकेटबद्दल असलेले योगदान माहिती आहे. मी त्यांचा प्रचंड आदर करतो. पतौडी सिनियर इंग्लंड आणि भारत दोन्ही संघाकडून खेळले. टायगर पतौडी यांनी भारताचे कर्णधारपद भूषवले. मी त्यांच्या खेळी पाहू शकलो नव्हतो कारण तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. पण त्यांचे किस्से ऐकले आहेत, जे सार्‍यांसाठी प्रेरणादायी आहेत. म्हणूनच ट्रॉफीचे नाव बदलू नये असे मी आग्रह धरला होता. पण काही नियमांमुळे ते बदलण्यात आले.
 
मला जेव्हा ट्रॉफी नावाचा वाद समजला तेव्हा मी स्वत: पतौडी कुटुंबाला फोन केला होता. मी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर मी बीसीसीआय, ईसीबी आणि जय शाह यांच्याशीही बोललो. पतौडी यांचे योगदान लक्षात राहायला हवे यासाठी काही ना काही केलेच पाहिजे असे मी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले. 
 
त्यानंतर पतौडी मेडलचा निर्णय घेतला गेला, असेही सचिनने जाणीवपूर्वक नमूद केले. अखेर मी आता ट्रॉफीचे नाव बदलले आहे हे सत्य स्वीकारले आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की मी सर्वप्रथम परदेश दौर्‍यावर १९८८ साली इंग्लंडलाच गेलो होतो. माझी सासूदेखील मूळची इंग्लंडची आहे. यॉर्कशायरसाठी खेळणारा मी पहिला बिगर-इंग्लिश खेळाडू होतो. त्यामुळे माझे इंग्लंडशी खूप घट्ट नाते आहे. त्यातच जेम्स अँडरसन याचेही नाव ट्रॉफीला आहे. तो इंग्लंडचा खूप महान क्रिकेटर आहे. त्यामुळे ट्रॉफीला माझे नाव देणे हा मी बहुमान समजतो, असेही सचिनने स्पष्ट केले.
 

Related Articles