प्रत्युत्तर शुल्क कपातीसाठी अमेरिकेत भारताचे प्रयत्न   

शिष्टमंडळाचा मुक्काम वाढला

नवी दिल्ली : अमेरिकेसोबत व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचा मुक्काम सोमवारपर्यंत वाढला आहे. वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या वॉशिंग्टन येथे आहे. सोमवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यापार करारावर व्यापक चर्चा केली. भारताचे शिष्टमंडळ २६ टक्के प्रत्युत्तर शुल्क कमी व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. 
 
दरम्यान, भारतीय शिष्टमंडळाचा अमेरिकेतील मुक्काम ३० जूनपर्यंत अगोदरच वाढविण्यात आला होता. खरे तर त्यांच्या मुक्कामाचा कालावधी २६ जूनपर्यंत होता. त्यात दोन दिवसांनी वाढ केली होती. दोन्ही देशांत हंगामी व्यापार करार ९ जुलैपर्यत करण्याचा विचार सुरू आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी भारतावर २६ टक्के प्रत्युत्तर शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. तो लागू करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. १० टक्के शुल्क नेहमीप्रमाणे तोपर्यंत लागू केले होते. ट्रम्प यांनी दिलेली मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे दोन्ही देशात हंगामी व्यापार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. २६ टक्के प्रत्युत्तर शुल्क कमी व्हावे, यासाठी भारताकडून वाटाघाटी केल्या जात आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प निर्णयावर ठाम 

भारतावरील २६ टक्के प्रत्युत्तर शुल्कात ९ जुलैनंतर कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेतील मुक्काम कितीही वाढविला तर माझ्या निर्णयात कोणताही फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, मी व्यापार करार करण्यासाठी मी ९० दिवसांचा अवधी दिला होता. त्या वेळेत करार झाला नाही तर प्रत्युत्तर शुल्क लागू केले जाणार म्हणजे जाणार. निर्णयात कोणताही बदल होणार नाही. कोणता देश आमच्याशी कसा वागतो ते आम्ही पाहात आहोत. ते चांगले किंवा वाईट वागले तरी अमेरिकेला काहीच फरक पडणार नाही. काही देश आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याची आम्ही तमा बाळकत नाही. आम्ही त्यांच्यावर प्रत्युत्तर शुल्क लादणारच आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. 
 

Related Articles