महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस   

चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून
 
सातारा, (प्रतिनिधी): जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने महाबळेश्वरमध्ये धुवांधार सुरूवात केली आहे. यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर शहरात गेल्या २४ तासात १८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
मुसळधार पाऊस होत असल्याने पर्यटन स्थळावरील सेल्फी पॉईंट तसेच तालुक्यातील लिंगमळा धबधबा, भिलार धबधबा, अंबनळी व तापोळा घाटातील सर्व लहान मोठे धबधबे तसेच (तलाव, वाहत असलेले ओढे-नाले, पूल) अशा धोकादायक ठिकाणी जाणे पर्यटकांनी टाळावे, असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडाक्याची थंडी, दाट धुक्यासह पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकाची तुरळक गर्दी आहे. वेण्णा तलावासह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.
 
प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. १ जून ते १८ जून या कालावधीत ४६५. ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुरूवारी अखेर पर्यंत २४ तासात १८९ मिमी तर एकूण ६५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला. दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम सुरू आहे. यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे.

Related Articles