पुणे-बंगळूरू मार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात   

महिलेचा जागीच मृत्यू, मोटार चालक जखमी 

सातारा, (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मोटारीमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (१९ जून) सकाळी झाला.पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील साशीमकुमार देवगरिया (वय-३५) हे पत्नी पारूमिता देवगरिया (वय -३०) समवेत मोटारीमधून बंगळूरू येथे राहात असलेल्या आपल्या भावाकडे निघाले होते. शेंद्रेजवळ पोहोचल्यानंतर पाठीमागून त्यांच्या मोटारीला अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या मोटारीने चार पलट्या घेतल्यानंतर दुभाजकावर धडकली. 
 
हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारीचे इंजिन तुटून रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी पाठीमागून आलेला एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटनेर दुभाजकावर जाऊन धडकला. अशा प्रकारे अन्य तीन टेम्पोही एकमेकांना धडकले. मात्र, त्यामध्ये कोणी जखमी झाले नाही. केवळ मोटारीमधील चालक साशीमकुमार हे जखमी झाले. तर त्यांची पत्नी पारूमिता ही जागीच ठार झाली.
 
या अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. साशीमकुमार यांच्या मोटारीचा वेग जास्त होता. दोघा पत्नी-पत्नीने सीट बेल्टही लावला होता. अपघातानंतर मोटारीच्या दोन्ही एअर बॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे साशीमकुमार हे या अपघातातून वाचले तर त्यांच्या पत्नीला दुभाजकावरील पत्रा लागल्याने मृत्यू झाल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले.

Related Articles