‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?   

ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय ६’ चे नेतृत्व आता ब्लेझ मेट्रेवेली करणार आहेत. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मेट्रेवेली यांची निवड केली आहे. अडीच दशके गुप्तचर अधिकारी म्हणून काम केल्यानंतर मेट्रेवेली यांना हे पद मिळाले असून, त्या ऑक्टोबरमध्ये रिचर्ड मूर यांची जागा घेणार आहेत. ११६ वर्षात पहिल्यांदाच संस्थेच्या प्रमुखपदी एका महिलेची निवड करण्यात आली आहे.

ब्लेझ मेट्रेवेली 

ब्लेझ मेट्रेवेली या ‘एमआय ६’ मध्ये तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विभागाच्या महासंचालक आहेत. यापूर्वी त्यांनी संचालकपदाची भूमिका बजावली होती. १९९९ मध्ये त्या सेवेत रुजू झाल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ मध्य पूर्व आणि युरोपमध्ये संस्थेच्या कामात घालवला. त्यांनी केंब्रिजमधील पेम्ब्रोक महाविद्यालयातून मानववंशशास्त्र या विषयावर अभ्यास केला.

‘एमआय ६’ काय आहे?

‘एमआय ६’ ही ब्रिटनची गुप्तचर संस्था आहे. १९०९ मध्ये या संस्थेची सुरुवात करण्यात आली होती. १९२० मध्ये या संस्थेला ‘एमआय ६’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ही संस्था परदेशी गुप्तचर माहिती गोळा करण्याचे, त्यांचे विश्लेषण करण्याचे आणि त्यांना प्रसारित करण्याचे काम करते. यामध्ये विशेष करुन सुरक्षा, गंभीर गुन्हे आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांशी संबंधित माहितीचा आणि परदेशी धोरणाचा समावेश असतो.

ऐतिहासिक नियुक्ती : स्टार्मर 

पंतप्रधान स्टार्मर यांनी मेट्रेवेली त्यांच्या नियुक्तीचे वर्णन ऐतिहासिक असे केले आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात मेट्रेवेली यांचा अनुभव आणि नेतृत्व ब्रिटनला एका मजबूत स्थितीत आणेल. त्यांची नियुक्ती गुप्तचर सेवेत विविधता आणि समावेशकता आणेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

जबाबदारीसोबतच एक मोठे आव्हान

एमआय ६ आणि एमआय ५ हे ब्रिटिश नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि त्यांच्या हितसंबंधांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया सारख्या देशांकडून धोके वाढत असताना मेट्रेवेली यांना  अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. डिजिटल युगात जिथे बायोमेट्रिक पाळत ठेवणे आणि सायबर धोक्यांचा संभव वाढला आहे, तिथे एमआय ६ ला अधिक काम करावे लागणार आहे.

‘एमआय ६’ च्या महत्त्वाच्या मोहिमा

ज्याप्रमाणे कोणत्याही देशाची गुप्तचर संस्था इतर देशांमध्ये जाऊन माहिती गोळा करते, त्याचप्रमाणे ‘एमआय ६’ देखील काम करते. देशाला संभाव्य धोक्यांबद्दल इशारा देते. १९३० आणि ४० च्या दशकात, ‘एमआय ६’ ही जगातील सर्वात प्रभावशाली गुप्तचर संस्था म्हणून उदयास आली. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियामध्ये जर्मनीविरुद्ध गुप्तचर मोहिमा राबवून वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी सोव्हिएत युनियनविरुद्ध देखील महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या. भारताची गुप्तचर संस्था ही प्रत्यक्षात ‘एमआय ६’ ची समतुल्य आहे.
 

Related Articles