पाकिस्तानी वाटाड्याला अटक   

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला

राजौरी/ जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशवाताद्यांच्या घुसखोरीचा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात कारवाई केली असून एका पाकिस्तानी वाटाड्याला अटक केली.
 
मोहमद अरिफ (वय २०) असे वाटाड्याचे नाव आहे. जैश ए मोहमदचे चार दहशतवादी त्याच्या मार्गदर्शनानुसार भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. दहशतवादी नियंत्रण रेषेवरील दुर्गम डोंगराळ भागांचा वापर करुन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न होते. जवानांनी 
तत्परतेने कारवाई केली. अरिफला अटक केली. त्याच्या सोबतचे दहशतवादी जखमी झाले असून ते डोंगराच्या उतारावरुन पाकिस्तानी हद्दीत पळून गेल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
अरिफ हा व्याप्त काश्मीरमधील डाटोटे गावचा रहिवासी आहे. गंभीर परिसरातील सीमेवरील लष्कराच्या हौजुरा पोस्ट परिसरात त्याला पकडले होते. पाकिस्तानी पोस्ट जवळच असल्याने भारतीय जवानांनी परिसरात गोळीबार केला नाही. मात्र, ड्रोनच्या पाहणीतून दिसून आले की, ज्या ठिकाणावरुन दहशतवादी पळून गेले तेथे रक्ताचे ओघळ दिसले. त्यात पळून जाताना ते जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. अरिफकडून एका मोबाइल, पाकिस्तानी २० हजार रुपये जप्त केले. त्याने कबुली दिली की, नियंत्रण रेषेजवळ राहात असल्याने परिसराची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करतो. त्याची कसून चौकशी केली जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भविष्यातील घुसखोरीच्या घटनांवर पायबंद घालण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. त्याचेकौशल्य जवानांकडे आहे. त्यामुळे ते तत्परतेने कारवाई करतात. परिसरात शांतता आणि घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Related Articles