प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये घट   

वृत्तवेध 

मे महिन्यामध्ये देशाअंतर्गत प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ०.८ टक्क्यांनी घटून ३,४४,६५६ युनिट्सवर आली. गेल्या वर्षी याच महिन्यात ३,४७,४९२ युनिट्सची विक्री झाली होती. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने दिलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात दुचाकींची घाऊक विक्री २.२ टक्क्यांनी वाढून १६,५५,९२७ युनिट्सवर गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १६,२०,०८४ युनिट्स होती. वाहन उत्पादकांच्या संघटनेने म्हटले आहे की सर्व श्रेणींमध्ये वाहनांची एकूण घाऊक विक्री १.८ टक्क्यांनी वाढून २०,१२,९६९ युनिट्सवर पोहोचली.
 
ती गेल्या वर्षी मे महिन्यात १९,७६,६७४ युनिट्स होती. ‘सियाम’चे महासंचालक राजेश मेनन यांनी निवेदनात म्हटले आहे की सर्व वाहन विभागांनी मे २०२५ मध्ये स्थिर कामगिरी नोंदवली. प्रवासी वाहन (पीव्ही) विभागात ०.८ टक्क्यांनी घट झाली असली तरी मे महिन्यात झालेली एकूण ३.४५ लाख युनिट्सची विक्री ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री आहे. ‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहन विभागात मारुती सुझुकी इंडियाची देशाअंतर्गत विक्री गेल्या महिन्यात १,३५,९६२ युनिट्स झाली. मे २०२४ मध्ये ती १,४४,००२ युनिट्स होती. आकडेवारीनुसार, देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने मे २०२४ मध्ये ४३,२१८ युनिट्सच्या तुलनेत ५२,४३१ युनिट्सची विक्री केली तर ह्युंदाई मोटर इंडियाने मे २०२४ मध्ये ४९,१५१ युनिट्सच्या तुलनेत ४३,८६१ युनिट्सची देशाअंतर्गत विक्री नोंदवली.
 
दुचाकी विभागात मोटारसायकल विक्री गेल्या महिन्यात १०,३९,१५६ युनिट्सवर जवळजवळ स्थिर राहिली. मे २०२४ मध्ये १०,३८,८२४ युनिट्सची विक्री झाली होती. दुसरीकडे स्कूटर विक्री ७.१ टक्क्यांनी वाढून ५,७९,५०७ युनिट्सवर पोहोचली. मे २०२४ मध्ये ती ५,४०,८६६ युनिट्स होती. देशांतर्गत बाजारात तीनचाकींची एकूण विक्री ३.३ टक्क्यांनी घसरून ५३,९४२ युनिट्सवर आली. मे २०२४ मध्ये ती ५५,७६३ युनिट्स होती.

Related Articles