मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी   

ट्रम्प यांच्याशी ३५ मिनिटे चर्चा

कनानास्किस, (कॅनडा) : पाकिस्तानच्या विनंतीनंतर आणि कोणाच्याही मध्यस्थीशिवाय संघर्षबंदी करण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. भारताने कधी मध्यस्थी स्विकारली नाही आणि स्विकारणारही नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी स्पष्टपणे सांगितले.
 
मोदी आणि ट्रम्प यांच्यात काल ३५ मिनिटे दूरध्वनीवर चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. यासोबतच, रशिया-युक्रेन, इस्रायल-इराणमधील संघर्षावरदेखील चर्चा झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबतची माहिती दिली.ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानातील लष्करी संघर्ष अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर संपुष्टात आला, असा दावा केला. त्यावरुन, विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच, पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी केली होती.
 
जी-७ शिखर परिषदेच्या वेळी मोदी व ट्रम्प यांची भेट होणार होती. मात्र, ट्रम्प तातडीने अमेरिकेला परतले. त्यामुळे, त्यांची मोदींबरोबर बैठक होऊ शकली नाही. पण, ट्रम्प यांच्या विनंतीवरून काल दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर ट्रम्प यांनी मोदी यांना दूरध्वनी केला होता. त्यानंतर, उभय नेत्यांमध्ये कालच प्रथम चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती दिली. भारत आता दहशतवादी कारवायांना युद्धच मानणार, असे स्पष्ट करतानाच ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरु आहे, असे सांगितले.
 
ट्रम्प यांच्याबरोबरील संभाषणात मोदी यांनी भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि कधीही स्वीकारणार नाही, असे ठामपणे सांगितले. या विषयावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे, असेही ते म्हणाले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचा आपला निर्धार संपूर्ण जगासमोर व्यक्त केला होता. भारताने फक्त पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यापुढे पाकिस्तानकडून होणार्‍या कोणत्याही आक्रमक कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. 
 
ट्रम्प यांनी मोदी यांना कॅनडाहून परतताना अमेरिकेला येऊ शकता का? अशी विचारणा केली. मात्र, मोदी यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते शक्य नसल्याचे सांगितले. पण, मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारले. ही भेट कधी हे अद्याप स्पष्ट नाही.
 

Related Articles