आयटीआय प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक जाहीर; अर्जासाठी २६ जूनपर्यंत मुदत   

पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या नवीन सुधारित वेळापत्रकानुसार, विद्यार्थी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. तर पहिली गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील १ हजार सात आयटीआय संस्थेत ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १.३९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची यासाठी नोंदणी केली आहे. प्रवेशाची अंतिम मुदत २६ जून असून विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.  
 
राज्यात ४१९ सरकारी आणि ५८८ खासगी अशा एकूण एक हजार सात आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. १५ मेपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १.३९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी १.२५ लाख अर्ज अंतिम करण्यात आले आहेत. मात्र, केवळ ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम सादर केला आहे. अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे टप्पे पूर्ण केलेले नाहीत. यापूर्वी केवळ नोंदणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. 
 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करण्याची मुदत : २७ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
पसंतीक्रम / प्राधान्य सादर करणे : २७ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी : ३० जून, सकाळी ११ वाजता
हरकती सादर करण्याची मुदत : १ जुलै, सायं. ५ वाजेपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी : ३ जुलै, सायं. ५ वाजता
पहिली प्रवेश यादी : ९ जुलै, सायं. ५ वाजता
प्रत्यक्ष प्रवेश (प्रथम फेरी) : १० ते १५ जुलै, सायं. ५ वाजेपर्यंत
दुसरी प्रवेश फेरी : २३ ते २८ जुलै
तिसरी प्रवेश फेरी : २८ जुलैपासून
चौथी प्रवेश फेरी : ४ ते ८ ऑगस्ट
संस्था स्तरावर समुपदेशन फेरी : २१ ऑगस्ट

Related Articles