पीएमपीच्या महिला विशेष बससेवेला चांगला प्रतिसाद   

सेवेचा विस्तार होण्याची शक्यता 

पुणे : महिला प्रवाशांना चांगली आरामदायी सुविधा उपलब्ध व्हावी. तसेच, सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, याकरिता पीएमपी प्रशासनाने निवडक मार्गावर गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस सेवा सुरू केली आहे. या बससेवेला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांचा प्रतिसाद बघता या बससेवेचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रशासन महिलांच्या विविध प्रश्नांबाबत अधिक गंभीर झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात बसमध्ये चोरी व छेडछाडीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने काही मार्गावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिला बससेवा सुरुवातीला केवळ दोन आगारातून सुरू करण्यात आली होती. आता ही सेवा प्रमुख १४ आगारांमधून सुरू करण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास अशा मर्यादित वेळेत सेवा असली तरी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
पहिल्या टप्प्यात ही सेवा १७ मार्गावर सुरू होती. आता शहरातील एकूण ३३ मार्गावर याचा विस्तार झाला आहे. यामुळे महिला प्रवाशांची चांगली सोय होत आहे. यासह महिला प्रवाशांमध्ये काही प्रमाणात सुरक्षेची भावना वाढीस लागली आहे. तसेच, छेडछाडीच्या त्रासांपासूनही प्रवाशांची सुटका झाली असल्याचे दिसून येत आहे. 
 
या मार्गावर सर्वाधिक प्रतिसाद 
 
पीएमपीच्या क्र.८२ या मार्गावर आतापर्यंत दोन हजार ६०२ महिलांनी प्रवास केला आहे. यातून ४९ हजार ६४५ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हा मार्ग वर्तुळाकार बससेवेचा आहे. एनडीए गेट क्र.१० या मार्गावर मनपा भवन, कोंढवा, वारजे, शिवणे, कर्वे रस्ता, कोथरूड स्थानक आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.  
 
कोथरूड आगार ते पुणे स्टेशन या मार्गाला महिला प्रवाशांचा सर्वांत कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. या मार्गावर आतापर्यंत सहा फेर्‍या झाल्या असून यातून केवळ एक हजार २४० रुपयांचे उत्पन्न पीएमपी प्रशासनाला मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गावरून केवळ अत्यंत कमी महिलांनी प्रवास केला आहे.

Related Articles