भारतात होणार 'फाल्कन २०००' विमानांची निर्मिती   

रिलायन्स एरोस्ट्रक्चरने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन 

या विमान कंपनीशी हातमिळवणी केली असून, या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे भारतात ‘फाल्कन २०००’ या व्यावसायिक विमानांची निर्मिती करणार आहेत.

उत्पादन आणि निर्मिती 

‘फाल्कन २०००’ या व्यावयायिक विमानाचे उत्पादन नागपूर येथील मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात असलेल्या अनिल धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये करण्यात येणार आहे. फ्रान्सच्या बाहेर डसॉल्ट पहिल्यांदाच त्यांचे फाल्कन विमान बांधणार आहे. यामुळे भारताची जागतिक एरोस्पेस उत्पादन साखळीतील भूमिका अधिक मजबूत होणार आहे. हा प्रकल्प ’मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यातून भारतात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन मिळत आहे. 

विमानाची वैशिष्ट्ये : 

हे २ क्रू मेंबर आणि १० ते १८ प्रवासी क्षमता असलेले चार्टर्ड विमान आहे. हे विमान ८५० किलोमीटर प्रति तास वेगाने आणि ३९ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. सलग ६००० किलोमीटर उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान व्यावसायिक, उद्योजक, श्रीमंत व्यक्ती आणि चार्टर्ड विमान सेवा देणार्‍या कंपन्यांकडून वापरले जाईल. काही देशांमध्ये तटरक्षक दलाकडूनही याचा वापर केला जातो. या विमानाची किंमत ३० ते ३५ मिलियन डॉलर्स असणार आहे.

पहिले विमान उड्डाण कधी?

२०१९ पासून या विमानाच्या कॉकपिट आणि संरचनात्मक घटकांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त प्रमुख उप- घटक तयार केले आहेत. फाल्कन सहा एक्स आणि आठ एक्सच्या पुढील भागांचे  आणि पंखांच्या जोडणीचे कामही येथे केले केले जाईल, त्यानंतर २०२८ पर्यंत हे विमान पहिले उड्डाण करू शकेल, असा कंपन्यांचा अंदाज आहे. 

रोजगारनिर्मितीला चालना 

रिलायन्स एरोस्ट्रक्चर आणि डसॉल्ट एव्हिएशनच्या भागीदारीमुळे  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. डीआरएएल शेकडो अभियंते आणि तंत्रज्ञांना कामावर ठेवण्याची योजना आखत आहे. ही वाढ भारताच्या विमान निर्मिती प्रकल्पाला बळकटी देण्याच्या दिशेने डसॉल्ट एव्हिएशनच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

रिलायन्स इन्फ्राचे समभाग तेजीत 

विमाननिर्मिती कंपन्यांच्या भागीदारीनंतर रिलायन्स इन्फ्राच्या समभागांत मोठी वाढ झाली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३८६.०५ रुपयांवर पोहोचले. 

डसॉल्टकडून दहा हजार विमानांची निर्मिती 

गेल्या शतकात ९० हून अधिक देशांमध्ये १० हजारहून अधिक लष्करी आणि नागरी विमाने (२,७०० फाल्कनसह) डसॉल्टने बनवली आहेत. लष्करी ड्रोन आणि अंतराळ प्रणालींपर्यंत सर्व प्रकारच्या विमानांची रचना, उत्पादन आणि विक्रीत त्यांनी जगभरात नावलौकीक मिळवला आहे. २०२४ मध्ये डसॉल्ट एव्हिएशनने ६.२ अब्ज युरोचे उत्पन्न नोंदवले. कंपनीकडे १४ हजार ६०० कर्मचारी आहेत.
 

Related Articles