अवघी बारामती झाली विठ्ठलमय   

तुकोबांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाकडून स्वागत

बारामती (प्रतिनिधी) : भाग गेला शिन गेला | अवघा झाला आनंद ॥  या अभंगा प्रमाणे  जवळपास शंभर किलोमीटरचे अंतर पार करून आलेल्या वारकर्‍यांवरच्या चेहर्‍यावर ज्ञानोबा तुकाराम नामामुळे थकवा न जाणवता  वारकरी भगव्या पताका, टाळ मृदंगाचा आवाजात, ज्ञानोबा-तुकाराम नामाच्या गजरात आसमंत दुमदुमत होता, आणि भजन कीर्तनामध्ये तल्लीन झालेले वारकरी तसेच गर्दीने फुललेले रस्ते, या भक्तिमय वातावरणात जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी  सोहळा मोरोपंतांच्या बारामती नगरीत विसावला. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.
 
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
 
नगरपरिषदेकडून वारकर्‍यांसाठी सुविधा - आषाढी वारीकरिता येणार्‍या वारकर्‍यांना सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकर्‍यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 
 
’हरित वारी-सुरक्षित वारी’ च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनिक्षेपकाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत.
 

Related Articles