तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास   

१५ ऑगस्टपासून देशभर लागू होणार

नवी दिल्ली : आता तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत २०० फेर्‍या करता येणार आहेत. हा वार्षिक पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. ही योजना १५ ऑगस्टपासून देशभर लागू होणार आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.
 
यामुळे फास्टॅगचे वारंवार रिचार्ज करावे लागणार नाही किंवा वारंवार टोल भरावा लागणार नाही. याउलट, सुलभ प्रवास करता येईल, असे गडकरी यांनी ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेर्‍या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील, असेही ते म्हणाले.
 
नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते. एकाच, परवडणार्‍या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहनांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. 
 
वार्षिक पास तुमच्या विद्यमान फास्टॅगवर सक्रिय केला जाऊ शकतो. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग येथे वैध असेल. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या २०२४ वर्षअखेरीसच्या आढाव्यानुसार, १ डिसेंबर २०२४ पर्यंत १०.१ कोटींहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले.  सध्या, विशिष्ट टोल प्लाझावरून वारंवार जाणार्‍या वाहनांसाठी मासिक पास उपलब्ध आहेत. या पासची किंमत महिन्याला ३४० रुपये आणि वार्षिक ४,०८० रुपये आहे. 
 

Related Articles