‘डॉ. राजा दीक्षित यांची कविता वैश्विकतेचा प्रत्यय देणारी’   

पुणे : कविता सामाजिक असते तशी वैश्विकही असते. याचा प्रत्यय प्रा. राजा दीक्षित यांच्या कवितांमधून येतो, असे मत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 
 
विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या ‘कुरबॅश आणि इतर कविता’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच प्रा. मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. साहित्यदीप प्रतिष्ठान आणि संवेदना प्रकाशन यांच्या वतीने हा सोहळा झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे  होते. अध्यक्षस्थानी विजय कुवळेकर होते. ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, विलास अत्रे, वि.सु. चव्हाण, सतीश गयावळ यावेळी उपस्थित होते.
 
कविता हा अनेकांना सोपा वाटणारा प्रकार मुळात अतिशय अवघड आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. मोरे म्हणाले, कविता केवळ लेखनाचा नव्हे तर जगण्याचा मार्ग आहे. प्रा. दीक्षित यांची प्रकृती मुळात काव्यात्म आहे. त्यांची कविता वैश्विकतेचे दर्शन घडविणारी आहे. प्रा. जोशी म्हणाले, सर्जनावर नितांत श्रद्धा असणारी प्रा. दीक्षित यांची कविता आहे. त्यांच्या कवितांमधून चिंतनशील कवीचे दर्शन घडते. मुक्तछंदाचा मोकाट छंद सध्या दिसतो. यात काव्यगुण हरवत तर नाही ना, याचा विचार करण्याची गरज आहे! टाळ्या आणि वाहवामध्ये अडकल्यास त्या चक्रातून बाहेर पडता येत नाही, हे गुंतणे कसदार निर्मितीला मारक ठरते, असे कुवळेकर यांनी सांगितले. 
 
सौम्यता आणि सौजन्यासाठी ओळखलो जात असलो तरी मी विद्रोही आणि ठामपणे पुरोगामी आहे, असे मनोगत प्रा. दीक्षित यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, वयाच्या नवव्या वर्षापासून कवितेची साथ आहे!  प्रकाशक नितीन हिरवे यांनीही मनोगत व्यक्त केले. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन  पं. संदीप अवचट यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात ’कुरबॅश आणि इतर कविता’ या कविता संग्रहातील कवितांचे अभिवाचन झाले. त्यामधे प्रमोद खराडे, चंचल काळे, माधव हुंडेकर, शंतनु कुलकर्णी, चिन्मयी चिटणीस आणि स्वतः  राजा दीक्षित  सहभागी झाले. याचे  सूत्रसंचालन कवयित्री निरुपमा महाजन यांनी केले.

Related Articles