पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज   

पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. महापालिकेकडून पालखी मुक्कामासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातून जाणार्‍या पालखी मार्गावर पावसापासून संरक्षण म्हणून मंडप, आरोग्य पथके, फिरते दवाखाने, फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसह इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. शहरात पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती कामे अंतिम टप्प्यात आली असून पुढील दोन दिवसांत ती पूर्ण होणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर यंदा मांडपला पत्रे लावले जाणार असून विशेष काळजी घेतली जाणार आहे. 
 
पुण्यात शुक्रवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत आहे. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम पालखींचे दर्शन घेऊन शहरात स्वागत करणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीने वारकर्‍याची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी प्रमाणेच पालखी मार्गावर असलेल्या ठिकाणी टँकर उभे करण्यात येणार असून, विविध ठिकाणी पाण्यासाठी स्टँडपोस्ट देखील उभे करण्यात येत आहेत. पालखीच्या पुण्यातील मुक्कामीवेळी भवानीपेठ आणि नानापेठ तसेच पालखी मार्गाच्या परिसरामध्ये ज्या पालिकेच्या वास्तूंमध्ये वारकर्‍यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे देखील टँकर उभे केले जाणार आहेत. तसेच, शहरामध्ये पालखी आगमन मुक्काम आणि प्रस्थानापर्यंत त्या त्या भागामधील पाणीपुरवठा देखील सुरळित ठेवण्याची व्यवस्था पाणीपुरवठा विभागाकडून केली जाणार आहे. पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात आलेला असून साफसफाई केली आहे. अग्निशमन विभागाने पालख्यांच्या मुक्कामाच्या काळात अग्निशमन दलाकडे जादा सेवकवर्ग उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व सेवकांच्या सर्व प्रकारच्या रजा व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापना संदर्भातही नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये वारकर्‍यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय, वारकर्‍यांसाठी पाणी, आरोग्य, स्वच्छतागृहे आदी सर्व विभागाकडून चोख व्यवस्था पालिकेने केली आहे. 
 
स्वच्छतेवर विशेष भर 
 
पालखी आगमन, मुक्काम आणि प्रस्थानानंतर अशा तीनही टप्प्यात वेळोवेळी स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने नियमित स्वच्छता केली जाणार आहे. पालखी पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दोन तासात पालखी मार्ग स्वच्छ केला जाणार आहे. 
 
स्वच्छता कर्मचारी तिन्ही टप्प्यात मुक्कामी टॉयलेट पालखी सोहळ्यासाठी १८०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिली असून मागणी नुसार आणखी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याबरोबर ५० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप केले जाणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
 
३६ ठिकाणी आरोग्य पथके
 
पालिकेकडून शहरात दोन्ही पालखी मार्गावर ३६ ठिकाणी आरोग्य पथके उपलब्ध करून दिली आहेत. पालखी आगमन काळात शहरातील सर्व पालिकेचे दवाखाने ओपीडी, सर्व मॅटरनिटी होममध्ये मोफत विनामुल्य सुविधा उपलब्ध असतील. दवाखान्यात एक डॉक्टर, एक नर्स आणि एक सहाय्यक अशी व्यवस्था प्रत्येक बूथवर असेल. आरोग्य सेवेसाठी सुमारे दीडशे ते दोनशे जणांचा समावेश असणार आहे. भवानी पेठेतील पालिकेच्या रूग्णालयात फिजिओ थेरपीची व्यवस्था असेल. शहरात फिरते दवाखाने असून पुणे ते पंढरपूर दरम्यान डॉक्टर, नर्स, सहायकांसह रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे महापालिकेचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 
 
महापालिका आयुक्तांसह सर्व पालिका टीम पालखी मार्ग पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा घेत आहे. रस्त्यांची कामे ९५ टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे दोन दिवसात पूर्ण होतील. मंडप उभारणी काम सुरू असून पावसामुळे यंदा मंडप पत्र्याचे टाकले आहेत. पालखी मुक्काम ठिकाणी सुमारे दीडशेच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वारकर्‍यांना सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमी पडू नये याची काळजी घेतली जात आहे.
 
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे.
 
शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने ठीक ठिकाणी बेरीकेडिंग केले आहे. ते काढले जात आहे. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक ती इतर सर्व कामे पूर्ण झाली असून वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
 
- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पुणे.

Related Articles