शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात   

पुणे : प्रत्येक नागरिकास सुरक्षित व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत शीतपेये, बर्फ, आईस्क्रिम, आंबा विक्रेता व उत्पादक यांची तपासणी करून ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
 
प्रशासनाने याकरिता एकूण ३० विक्रेत्यांची तपासणी करून ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले असून, त्याचे अहवाल प्रलंबित असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने पुढील कारवाई घेण्यात येईल, तसेच १२ आंब्याचे नमुने घेण्यात आले होते. सर्व नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत. शीतपेयाचे ५ नमुने घेण्यात आले असून, १ नमुना प्रमाणित दर्जाचा व २ नमुने मिध्याछाप घोषित झाल्याने त्या अनुषंगाने पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
 
प्रत्येक नागरिकास सुरक्षित व निर्मळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्षता घेत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त अन्न पदार्थाबाबत संशय असल्यास किंवा त्याबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सु.ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.

Related Articles