शेतकर्‍यांचा अवमान केला नाही; तरीही माफी मागतो.   

लोणीकर यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य बनलेल्या भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्टीकरण केले. मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे, 25 वर्ष शेतकरी मला निवडून देत आहेत. मी शेतकर्‍यांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली आहेत. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकर्‍यांच्या बाजूने आहे, मी शेतकर्‍यांच्या विरोधात बोललो नाही काही जण राजकारण करत आहेत. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले. लोणीकर हे स्पष्टीकरण करत असताना विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. यामुळे गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
 
लोणीकर यांच्या शेतकरी विरोधातील वक्तव्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोणीकर यांनी काल विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मी शेतकरी विरोधी बोललो असेन तर हजार वेळा माफी मागायला तयार आहे. पण, माझ्या वक्तव्याची मोडतोड केली असल्याचे लोणीकर म्हणाले. मी जे बोललो नाही ते मी बोललो, असा आरोप करून राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. 
 

Related Articles