कैद्यांचे ससूनमधील ’मेडिकल टूरिझम’ बंद करा   

पोलिस आयुक्तांचे आदेश

पुणे : येरवडा कारागृहातील शिक्षा न झालेले न्यायाधीन बंदी आणि शिक्षा झालेले काही कैदी उपचाराच्या नावाखाली ससून रूग्णालयात दाखल होतात आणि गैरप्रकार करतात. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ससूनमधील कैद्यांचे मेडिकल टुरिझम बंद केले गेले पाहिजे, असा आदेश पोलीस आयुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. तसेच, अत्यावश्यक आणि तातडीचे वैद्यकीय उपचार कैद्यांवर वेळेत व्हावेत, अशी सूचना त्यांनी केली. 
 
ससून रुग्णालयातील नुतनीकरण केलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, स्मार्तना पाटील, ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लप्पा जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता किर्ती कुंजीर या वेळी उपस्थित होते.
 
अमितेश कुमार म्हणाले, ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली काही सराईत गुन्हेगार दीर्घ काळ वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. काही आरोपींना उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर पसार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. उपचारांच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असतात. सराइतांना भेटण्यासाठी नातेवाईक आणि साथीदार रुग्णालयात येतात. उपचारांच्या नावाखाली ससूनमधील ‘मेडिकल टुरिझम’ बंद करा. तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ससूनमध्ये कैद्यांना दाखल करण्यात यावे.ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. 

Related Articles