आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू   

गावरान जांभळाचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे : लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ म्हणून जांभळाची ओळख आहे. तसेच अनेक आजारावरचे गुणकारी औषध म्हणूनही जांभूळ ओखळे जाते. पुण्यात आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू झाली आहे. सद्य:स्थितीत ग्राहकांकडून जांभळाला चांगली मागणी असल्याचे व्यापारी माऊली आंबेकर व पांडुरंग सुपेकर यांनी बुधवारी दिली.
 
मार्केट यार्डातील फळ विभागात आंध्र प्रदेश येथून जांभळाची आवक सुरू झाली आहे. गुजरात आणि कर्नाटक येथील जांभळाला हंगाम संपला आहे. तेथून होणारी आवक थांबली आहे. राज्यातील गावरान जांभळाचा हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील आठवडाभर गावरान जांभळाची आवक सुरू राहिल. त्यामुळे बाजारात आता केवळ आंध्र प्रदेशचे जांभूळ असणार आहेत. पुढील महिनाभर आंध्र प्रदेशच्या जांभळाची चव पुणेकरांना चाखाता येणार आहे. घाऊक बाजारात आंध्र प्रदेश येथून रविवारी आणि शुक्रवारी ४० ते ५० टन आवक होत आहे. तर इतर दिवशी मात्र २५ ते ३० टन आवक होत आहे. घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार १०० ते १५० रुपये भाव मिळत आहे.  
 
तीन वर्षांपासून आवक 
 
आंध्र प्रदेश येथून जांभळाची आवक सुरू झाली आहे. मागील तीन वर्षांपासून बाजारात आंध्र प्रदेशच्या जांभळाची आवक होत आहे. या जांभळास पुणेकराकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात आंध्र प्रदेशातून येणार्‍या जांभळाची  आवक वाढणार आहे.
 
- माऊली आंबेकर, जांभळाचे व्यापारी, मार्केट यार्ड
 
लाल मातीत जांभळाची लागवड
 
आंध्र प्रदेश येथून मदनपल्ली जिल्ह्यातून ही आवक होत आहे. जिल्ह्यात २०० किलोमीटर परिसरात मागील काही वर्षात जांभळाची लागवड करण्यात आली आहे. त्याचे उत्पादन आतासुरू झाले आहे. लाल मातीत हे पिक घेण्यात आले आहे. फळ उच्च दर्जाचे आहे. दिसायला आकर्षक आहे. गर जास्त तर बी लहान आकाराचे आहे. हे जांभूळ चवीला गोड आहे.
 
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केटयार्ड.

Related Articles