मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच   

अनेक विमाधारकांसह नॉमिनींचा मृत्यू 

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील अनेक प्रवाशांचे उत्तराधिकारी (नॉमिनी) देखील त्यांच्यासोबतच मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे विम्याची रक्कम कोणाला आणि कशी द्यायची ? याचा पेच विमा कंपन्यांसमोर आता उभा राहिला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू झाला. यानंतर विमा नियंत्रण अणि विकास प्राधिकरणाने मृत व्यक्तींच्या उत्तराधिकार्‍यांना (नॉमिनी) विम्याची रक्कम देण्याचे निर्देश कंपन्यांना दिले होते. त्यासाठी ओळख पटवा आणि माहितीचे संकलन करण्याचे आदेश दिले होते. त्यात अनेकांचा वैद्यकीय, वैयक्तिक विमा आणि जीवन विम्याचा देखील समावेश आहे. मृत व्यक्तींची कोणतीही कुटुुंबे  विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहता कामा नयेत. त्याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यास कंपन्यांना बजावले आहे.  यानंतर भारतीय जीवन विमा महामंडळ, न्यू इंडिया इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, इफको, टोकियो जनरल इन्शुरन्स, बजाज अलियांझ जीआयसी आणि टाटा एआयजी कंपन्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात मदत केंद्रे उभारली आहेत. मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. एलआयसीचे प्रशासकीय अधिकारी आशिष शुक्ला यांनी सांगितले की, दहा जणांनी आतापर्यत विमा दावा केला. अशा अनेक घटना आहेत की, ज्यात दांपत्याचा मृत्यू झाला. त्यापैकी एक विमा धारक असून दुसरा उत्तराधिकारी आहे. अशा वेळी विमा रक्कम कोणाला द्यायची ? असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला आहे. इफकोचे व्यवस्थापक मनप्रित सिंह सबरवाल यांनी सांगितले की, एका कंपनीचा संचालक आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नीची उत्तराधिकारी म्हणून नोंद आहे. सबरवाल यांच्या कंपनीने कर्मचार्‍यांचा समूह विमा देखील उतरविला आहे.

Related Articles