माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात   

ज्ञानोबा माउली तुकाराम अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म

सोलापूर, (प्रतिनिधी) : माउली माउली.. अशा जयघोषात सकाळच्या सत्रात लाखो विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत श्री संत चक्रवती शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण बुधवारी सकाळी खुडूस फाटा येथे अपार अशा उत्साहात पार पडले. 
   
माळशिरस येथील पहाटे पाच वाजता पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते महापूजा उरकून सकाळी सोहळ्याने दुसर्‍या गोल रिंगणाकडे खुडूस फाट्याकडे आगेकूच केली. सकाळच्या उबदार हवामानात ज्ञानोबा तुकारामचा गजर करीत माळशिरस तालुका हा वारकरीमय झाला होता. जरीपटक्याच्या निशाना असलेल्या अश्‍वाने रिंगण स्थळी प्रवेश केला. सुरुवातीला पालखी रिंगण सोहळ्याभोवती फिरवून आणून मध्यभागी असलेल्या चबुतरावर विराजमान करण्यात आली. त्या पाठोपाठ माउलींचा लवाजमा डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, वीणेकरी आणि दिंड्या आल्या. रिंगणात वैष्णवांचा मेळा पोहोचताच लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात ज्ञानेश्‍वर माउलींचे स्वागत केले. माउलींच्या पालखीचे व अश्‍वाचे स्वागत व पूजा खुडूस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.
 
चोपदारांनी रिंगण लावून घेतले. मानाच्या दिंड्यांना आत सोडले. त्यानंतर दिंडीतील मानाच्या जरीपटक्याने रिंगण मैदानाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यावेळी रिंगण चालू झाले. माउलींच्या अश्‍वाने दौडण्यास सुरुवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माउलींचा गजर सुरू केला. अश्‍वाने फेर्‍या पूर्ण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण होताच अश्‍वाच्या टाचेखालील माती कपाळावर लावण्यासाठी झुंबड उडाली होती. रिंगणाचे अश्‍व विसावताच वारकरी मैदानात उतरले. दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने ज्ञानोबा माउली तुकाराम...अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. वृद्व, महिला, अवघी तरुणाई तल्लीन होऊन श्‍वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन झाले. एकात्म भक्तिभावाचा हा शाश्‍वत सुखाचा सोहळा भाविकांनी अनुभवला. हा सोहळा खुडूस येथील स्वागत होऊन निमगाव पाटी येथे दुपारी विसावा घेऊन वेळापूर नगरीमध्ये विसावला.
 

Related Articles