सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला   

राडारोडा अजूनही नदीपात्रातच

पुणे : ओंकारेश्वर मंदिराच्या जवळचा आणि शनिवार पेठ नदीपात्रातून सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल महापालिकेने नुकताच पाडला. मात्र, पुलाचा राडारोडा नदीपात्रातच टाकण्यात आला आहे. तर, प्रवाहातील पुलाचे रॉड, मोर्यांचा काही अवशेष अद्याप काढलेला नाही. त्यामुळे पुन्हा कचरा, पाण्याबरोबर वाहून आलेली जलपर्णी अडकू लागली आहे.
 
नारायण पेठ तसेच डेक्कन परिसरातून नदीपात्रातून पुणे महापालिकेकडे जाताना वाहनचालकांना ओंकारेश्वर मंदिरावरून जावे लागते. काही वर्षांपूर्वी नागरिकांना नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोईचे व्हावे, यासाठी नदीपात्रातून वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला होता. मुठा नदीपात्रात सुमारे ५५ वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक वाहने धुणे, मासे पकडणे, तसेच प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी करत होती. वाहतुकीसाठी पुलाचा वापर होत नव्हता. मात्र, दर वर्षी पावसाळ्यात या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकतो. हा पूल जीर्ण झाल्याने वापरासाठी सुरक्षित नव्हता. याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला लाखो रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे लेखापरीक्षण केले. पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याला अडथळा निर्माण होत असल्याने हा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. 
 
पंधरा दिवसांपुर्वी हा पुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. हा पुल पाडला मात्र पाडलेल्या पुलाचा राडारोडा नदीपात्रातच टाकून दिला. तर, प्रवाहातील अवशेष प्रवाहातच अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात प्रवाहाला कचरा, जलपर्णी अडकून अडथळा वाढला आहे.पाण्यात उतरणारे मशीन उपलब्ध नसल्याने पुलाचा राडारोडा उचलला नाही. पाण्यात उतरणारे मशीन मागविले असून पुलाचा राडारोडा उचलणे आणि पुलाचे इतर अवशेष काढले जातील. हे काम खात्याकडून सुरू असल्याने या कामाला खर्च नाही.
 
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग, पुणे महापालिका

Related Articles