सर्व कामे जुलै अखेर सुरू करा : डुडी   

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, आचारसंहिता लक्षात घेता सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्रस्तावित कामांना २५ जूनपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन ३१ जुलैच्या आत प्रस्तावित कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
 
डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपल्या प्रस्तावास तात्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी व २५ जून पूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे ३१ जुलै २०२५ च्या आत सुरू करावीत. वरिष्ठ स्तरांवरून घ्यावयाच्या मान्यता संदर्भात पाठ्यपुस्तकासाठी यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन शाखेत तात्काळ सादर करावेत. या संदर्भात कृषी महिला व बालविका, कौशल्य, विकास रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग, शिक्षण, पोलिस आदि विभागांनी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत निधीची मागणी नोंदवून प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.
 
राज्य शासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी १ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून, यामध्ये सर्व विभागांनी आपपला सहभाग नोंदवून जास्त वृक्षांची लागवड करण्याची सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केली आहे.

Related Articles