हिमाचलमध्ये पावसाचा कहर   

पाच मजली इमारत कोसळली 

दरडी कोसळल्याने महामार्ग बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी मान्सूनचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पावसामुळे ठिक-ठिकाणी दरडी कोसळणे, इमारत कोसळणे, नद्या-नाल्यांना पूर येणे आणि महामार्ग बंद होणे अशा घटना घडत आहेत. सोमवारी सकाळी शिमलाच्या उपनगरातील भट्टाकुफेर येथे एक पाच मजली इमारत कोसळली.  तर रामपूरमध्ये ढगफुटीत एका गोठ्यातील अनेक गायी वाहून गेल्या. 
 
शिमल्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारच्या पावसानंतर पाच मजली इमारतीजवळील जमीन खचत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रविवारी इमारत रिकामी करण्यात आली होती. सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही इमारत कोसळली. चार पदरी रस्त्याच्या बांधकामामुळे इमारतीला धोका निर्माण झाला होता. परंतु,  सुरक्षिततेसाठी कोणतेही उपाय केले गेले नाहीत, असे इमारतीच्या मालकीण रंजना वर्मा यांनी सांगितले.रामपूरमधील सिकासेरी गावात ढगफुटीनंतर एका गोठ्यातील तीन गायी अणि दोन वासरे वाहून गेली. यासोबतच, एक घरदेखील वाहून गेले.  
 
सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मागीलवर्षी जुलैमध्ये समेज येथे ढगफुटीने २१ जणांचा बळी घेतला होता.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे. शिमला-चंडीगढ राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे, या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. कोटी जवळील चक्की मोर येथेही महामार्गावर अशीच परिस्थिती आहे. सोलन जिल्ह्यातील डेल्गी येथे दरड कोसळल्याने सुबाथू-वाकनाघाट रस्ता बंद करण्यात आला. हवामान विभागाने चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर या सात जिल्ह्यांत पुढील २४ तास मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच, बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पालमपूर, बैजनाथ, सुंदरनगर, मुरारी देवी, कांगडा, शिमला आणि जुब्बरहट्टी भागात काल वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.राज्यात २० ते २९ जूनदरम्यान विविध घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर, चार जण बेपत्ता झाले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

Related Articles