सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्‍यांना अटक   

पुणे : वडगाव येथील गजानन ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात शिरून पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणार्‍या तिघा सराईतांना सिंहगड रोड पोलिसांनी अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. दरोडा घालत असताना सीसीटिव्हीमध्ये कैद झालेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे चौकशी करून इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
सराफ व्यावसायिक मंगल शंकरराव घाडगे (वय ५५, सदाशिव दांगटनगर, धबाडी, आंबेगाव) यांचे श्री गजानन ज्वेलर्स हे सराफी दुकान वडगाव बुद्रुक येथे आहे. त्यांच्या दुकानामध्ये मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन दरोडेखोर शिरले. त्यावेळी त्यांचा एक साथीदार बाहेर दुचाकीवर बसून होता. त्यांच्यातील एकाने हातातील कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याला मंगल घाडगे यांनी प्रतिकार केला. 
 
तेव्हा दरोडेखोराने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये त्या जखमी झाल्या. दरोडेखोरांनी कपाटाच्या काचा हत्याराने फोडून कपाटामधील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. दुचाकीवरुन जाताना त्यांनी हातातील पिस्तूल व लोखंडी हत्यारे हवेत फिरवत लोकामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. सीसीटिव्हीच्या चित्रीकरणात कैद झालेल्या दरोडेखोरांचा माग घेण्यासाठी पोलिसांनी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. 
 
त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलाला रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतरांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पुण्यात आणल्यानंतर चौकशी करून घटनेचा उलगडा होईल, असे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
 

Related Articles