सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू   

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांच्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास  एक भीषण अपघात घडला आहे. वेगातील फिरत्या ऑक्टोपस पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने व त्याचे बोल्ट तुटल्याने एक पाळणा निसटून हवेतून खाली कोसळला. या दुर्घटनेत  इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील एलआयसी उद्योजक असलेले तुषार धुमाळ (वय २७) यांचा उपचार सुरू असताना रूग्णालयात मृत्यू झाला. तर दोघे जण पर्यटक  गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अकलूज येथील मोहिते-पाटील कुटुंबीयातील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मालकीचे हे सयाजीराजे वॉटर पार्क आहे. 
 
सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सुट्टीच्या दिवशी तर हे वॉटर पार्क पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. बुधवारी सुद्धा वॉटर पार्क वर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या वॉटर पार्कमध्ये असलेल्या ऑक्टोपस पाळण्यामध्ये पर्यटक बसले होते. एका पाळण्यात तिघेजण पर्यटक बसण्याची व्यवस्था आहे. पाळणा वेगाने फिरत असताना तो निष्ठून हवेतून खाली कोसळला आणि भिगवण येथील तुषार धुमाळ यांच्यासह तिघेजण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच उपचार सुरू असताना धुमाळ यांचा मृत्यू झाला. दोन अन्य पर्यटकसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाला मानेला गंभीर दुखापत झाली असून मोठे फ्रॅक्चर झाले आहे.त्या पर्यटकावर  अकलूजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. पर्यटकांसोबत आलेल्या कुटुंबीयातील सदस्यांचा आक्रोश होता. या दुर्घटनेमुळे वॉटर पार्कवर मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. 
 

Related Articles