पादुका स्नानाला यावर्षी टँकरची गरज नाही   

इंदापूर, (वार्ताहर) : सराटी येथे निरा नदीपात्रात १ जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांना परंपरेनुसार निरा स्नानाचा धार्मिक विधी होणार आहे. या धार्मिक विधीसाठी अनेकदा नदीपात्र कोरडे असल्याने यापूर्वी काही वेळा टँकरने पाणी आणावे लागले आहे; मात्र चालू वर्षी नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असल्याने निरा स्नान उत्साही वातावरणात पार पडेल. इंदापूर तालुक्यातून वाहणारी नीरा नदी विक्रमी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याने गेली गेली महिनाभरापासून तुडुंब भरून वाहत असल्याने नदीपात्राचे सौंदर्य चांगलेच खुलल्याचे मनमोहक दृश्य सध्या पाहवयास मिळत आहे.
 
जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही बिकट होत चालला होता. परंतु मे मध्ये गेल्या ३०-४० वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या विक्रमी अवकाळी पावसाने नदीला तुडुंब पाणी आल्याने, सध्या नदी खळखळ आवाज करून वाहत आहे. नदीपात्रात पक्ष्यांचा किलकिलाट पुन्हा वाढला आहे. त्याच बरोबर नदीकाठच्या गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती नीरा भीमा कारखान्याची संचालक राहुल कांबळे (खोरोची),  गोंदी-ओझरेचे सरपंच रणजीत वाघमोडे, सागर सवासे (बोराटवाडी), किरण पाटील (चाकाटी) संदीप वाघमोडे (पीठेवाडी) यांनी दिली. दरम्यान, नदी पाण्याने वाहत असल्याने नदीकाठची शेती बहरणार आहे.
 

Related Articles