जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार   

नीरा, (वार्ताहर) : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव मार्गावर बुधवारी सायंकाळी मोटार आणि टेम्पोच्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जेजुरी पोलिस स्थानकच्या हद्दीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
जेजुरीकडून बारामतीच्या दिशेने निघालेली एक मोटार रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडकली. या धडकेत टेम्पोमधून साहित्य उतरवणारे मजूर आणि मोटारीमधील प्रवासी यांचा  या अपघातात समावेश आहे. या अपघातात एकूण आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, यात मोटारीतील चार प्रवासी  आहेत. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
सोमनाथ रामचंद्र वायसे (रा. नाझरेकडेपाठार ता. पुरंदर, जि. पुणे), रामू संजीवनी यादव (रा. नाझरेकडे पाठार ता. पुरंदर, जि. पुणे), अजयकुमार चव्हाण ( रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे ता.भोर, जि. पुणे), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी ता. इंदापूर, जि. पुणे), अश्विनी संतोष एस आर (रा. सोलापूर), अक्षय संजय राऊत (रा. झारगडवाडी ता. बारामती, जि. पुणे), किसनलाल (रा. बिकानेर (राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
 
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, भरधाव वेगाने येणारी मोटार उभ्या टेम्पोवर आदळल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाहतूक विस्कळीत

या अपघातामुळे जेजुरी-मोरगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. हा अपघात परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, लवकरच अधिक माहिती समोर येईल.
 

Related Articles