मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला   

पुणे : पशुपक्षी, वृक्षवेली, अरण्य आणि माणसे हे मारूती चितमपल्ली यांच्या साहित्याचे नायक होते. आदिवासी बोलीभाषेतील अपरिचित परंतु सुंदर असंख्य शब्दांची ओळख चितमपल्ली यांनी मराठी साहित्याला करून दिली. त्यांनी निसर्ग साहित्याला वाड्:मयात वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळे मारूती चितमपल्ली यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला आहे. अशा शब्दांत साहित्यिकांनी चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहिली. 
निसर्ग चित्रणातील हिरवी पहाट हरवली
 
आवड अभ्यास आणि सुक्ष्म निरीक्षणाला अनुभवाची जोड देत मारूती चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली. निसर्ग ही त्यांच्या साहित्याची पहिली आणि अंतिम प्रेरणा होती. निसर्गातील अलक्षित, अस्पर्श आणि गुढ जीवन जे मराठी वाचकांना अपरिचित होते. त्याचा परिचय चितमपल्ली यांनी करून दिला. पक्षीकोश, वन्यपशुकोश, मत्स्यकोश, वृक्षकोश निर्माण करून त्यांनी कोशवाड्:मयात भर घातली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व एका ऋषितुल्य लेखकाला मुखले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
 
- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ. 
 
साहित्यातील सृजनशिल हिरवे पर्व हरवले
 
मारूती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्यातील सजृनशिल हिरवे पर्व संपले आहे. त्यांनी वनविभागात नोकरी करून पक्ष्यांचे जीवन साहित्यात आणले. निसर्ग, प्राणी, माणूस आणि त्यांच्या भावभावना त्यांनी साहित्यात मांडल्या. बोलीभाषांचे शब्दघोष तयार करून मातृभाषा समृद्ध केली. त्यांनी आयुष्यभर अतिशय तटस्थपणे लेखन केले आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. 
 
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष. 
 
जंगल जगलेला साहित्यऋषी
 
मराठीत निसर्ग विषयक वाड्:मयात मोजक्याच लेखकांनी कार्य केले आहे.  ललित वाड्:मय समृध्द करणारे लेखक म्हणून चितमपल्ली यांची ओळख आहे.   वन्यजीवन विषयक साहित्यात त्यांचे योगदान मोठे आहे. ते वनअधिकारी होते. जास्ती काळ जंगलाशी संबंधित होते. त्यांनी प्रत्यक्ष जंगल जगले होते. त्यांना जंगलाचा साक्षात अनुभव असल्यामुळे त्यांची पुस्तके प्रत्यकारी होते. त्यांनी मराठी वाड्:मयातील दालन समृद्ध केले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला आहे. 

 

- डॉ. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, विश्वकोष मंडळ.

Related Articles