'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'   

माजी वैमानिकाने दोन मुद्दे आणले चर्चेत 

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. विमानाचा अपघात का झाला, याबद्दल वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून समोर येत आहेत. माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजाने यांनी अपघाताबद्दल दोन मुद्दे मांडले आहेत. 
 
गौरव तनेजा हे एअर एशियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ते कॅप्टन होते. गौरव तनेजांनी नवीन व्हिडीओमध्ये फ्लाईट रडार ऍपच्या ताज्या माहितीचा हवाला दिला. हे ऍपच्या मदतीने लोक हवाई वाहतुकीबद्दल माहिती मिळवू शकतात. 

विमानाला 'टेक ऑफ' जास्त वेळ लागला

गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाचा धावपट्टीवरून जातानाचा व्हिडीओ दाखवला. त्यांनी म्हटले आहे की, विमान उड्डाण करताना धावपट्टीवर धूळ उडताना दिसत आहे. यातून असे दिसते की, विमानाने पक्क्या धावपट्टीवरून नाही, तर कच्च्या किंवा धूळ असलेल्या धावपट्टीवरून उड्डाण केले. विमानाने धावपट्टी शेवटच्या टोकावरून टेक ऑफ केले आणि ही बाब सामान्य मानली जात नाही.

ओव्हरलोडिंगमुळे विमान उड्डाण करू शकले नाही?

गौरव तनेजांनी म्हटले आहे की, या विमानाला जास्त वेळ धावपट्टीवरून जावे लागले आणि उड्डाण करताना लगेच वेग कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विमानामध्ये काहीतरी गडबड होती. मग लोडिंगमध्ये काही अडचणी होत्या का? कारण असे अपघात यापूर्वीही झाले आहेत. १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच अपघात झाला होता, त्याचे कारण ओव्हरलोडिंग होते.

जास्त नफा कमावण्यासाठी 

गौरव तनेजा म्हणाले की, 'अनेकदा विमान कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी विमानात जास्त सामान लादतात. सामान कागदोपत्री कमी दाखवले जाते, पण प्रत्यक्षात विमानात वजन जास्त असते. यावेळीही असेच काही झाले होते का? इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सामानाचे वजन चुकीचे सांगितले गेले होते आणि अपघात झाला होता', असेही ते म्हणाले. 

Related Articles