केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात   

भूस्खलन होऊन ढिगाऱ्याखाली लोक अडकले, दोघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झाले. या मार्गावर भूस्खलन झाल्याने मोठा अपघात झाला. भूस्खलन होऊन डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले. ढिगाऱ्याखाली दबल्याने या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. अपघातग्रस्त ठिकाणी बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले. या आधीही दोन दिवसांपूर्वी पावसामुळे केदारनाथ मार्गावर अपघात झाला होता.
 
केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर जंगलचट्टी घाटाजवळील डोंगराच्या माथ्यावरून दगड पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले, अशी माहिती रुद्रप्रयाग पोलिसांनी दिली आहे.
 
केदारनाथ मार्गावर १८ जून रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी जंगलचट्टी गधेरेजवळ डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि दगड कोसळले. यात पाच लोक ढिगाऱ्याखाली आले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ जंगलचट्टी येथील पोलिसांनी आणि डीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि डीडीआरएफचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बाधितांना वाचवण्यात आले.
 
या अपघातात काही लोक केदारनाथ येथील मार्गावर बाजूलाच असलेल्या दरीत कोसळले होते. त्यांना वाचवण्यात पोलिसांत यश आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गौरीकुंड येथील रुग्णालयात दाखल केले. त्याशिवाय दोघांचा यात मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे. तर जखमी व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. सततच्या पावसामुळे सोनप्रयाग आणि गौरीकुंडमध्ये प्रवाशांना रोखण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
 

Related Articles