अवकाळीमुळे पिकांचे नुकसान   

४४ कोटी ५८ लाखांची भरपाईची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूरसह ९ तालुक्यांमध्ये एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे १६ हजार हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ९९४ गावांतील ५० हजार ५८८ शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुमारे ४४ कोटी ५८ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठवला आहे.
 
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सहा तालुक्यांतील ५२ गावामधील ५६७ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यात १३९५ शेतकरी बाधित झाले होते. त्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ४५ हजार ९०२ शेतकर्‍यांच्या १५ हजार ६७ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. एकूण नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये ४१ हजार ३४३ शेतकर्‍यांच्या फळपिकांचे बागायत सोडून १३२८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिरायत भाागातील १४५२ शेतकर्‍यांचे ४५८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या गारपीट तसेच पावसामुळे ९ तालुक्यातील ९९४ गावातील ४ हजार ६८४ शेतकर्‍यांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. त्याचे १०७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जमिनीचे तसेच फळबाग सोडून बागायत आणि जिरायत शेत पिकांचे नुकसान झाल्याने १ एप्रिल २०२४ च्या आदेशान्वये सुमारे ४४ कोटी ५८ लाख ४२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे.

Related Articles