अभियांत्रिकीसह एमबीए पदवी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात   

नोंदणीसाठी ८ जुलैपर्यंत मुदत

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बी.ई./बी.टेक. (चार वर्षे) आणि पाच वर्षांच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी तसेच एमबीए प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलैला तर हरकती विचारात घेत अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
 
यंदा एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल १६ आणि १७ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी ही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी यंदा कागदपत्रे पडताळणीसाठी दोन पर्याय आहेत असणार आहेत. ई-स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी. ई-स्क्रुटिनीसाठी अर्जदाराने ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ही पडताळणी स्क्रुटिनी केंद्राकडून ऑनलाइनच केली जाईल. प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सुविधा केंद्रावर उपस्थित राहून अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.
 
अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या अनिवार्य विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि वैकल्पिक विषयांसह किमान ४५ टक्के गुण (मागासवर्गीयांसाठी ४० टक्के) मिळविले असणे आवश्यक आहे.तसेच, एमएचटी-सीईटी किंवा जेईई मेन्स परीक्षांमध्ये वैध गुण मिळवणे आवश्यक आहे. सीईटीसाठी पूर्वीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. इतर विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सामान्य प्रवर्गासाठी १ हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्ग, दिव्यांग, ट्रान्सजेंडर प्रवर्गासाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
 
वेळापत्रक
 
० विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी : ८ जुलैपर्यंत
० कागदपत्रांची पडताळणी : ३० जून ते ९ जुलै
० प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी : १२ जुलै
० यादीवर हरकती व तक्रार : १३ ते १५ जुलै (सायंकाळी ५ पर्यंत)
० अंतिम गुणवत्ता यादी : १७ जुलै
० पसंतीक्रम व पुढील गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार.

Related Articles