जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास   

डॉ. विजय केळकर यांचे प्रतिपादन 

पुणे : जीएसटी प्रणालीमधील असमानता दूर करून त्यात अधिक सुसूत्रता आणावी. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर त्याचे समान वाटप केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकास साधेल, असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केला.डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता, बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि प्रा. एम.एम. शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. विजय केळकर यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, दिलीप कुंभोजकर, काका धर्मावत आणि गजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
 
डॉ. केळकर म्हणाले, मी स्थलांतर प्रक्रीयेच्या बाजुने असलो, तरी शहरातील नागरी सेवा सुविधांच्या अभावामुळे शहरी अर्थकारणाला पुरेशी गती प्राप्त होत नाही.  स्थानिक नेतृत्वाला बळ देऊन स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम झाल्यास नागरी सेवा-सुविधांसह स्थानिक अर्थकारण बळकट होण्यास मदत होईल. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, स्वच्छता अशा मुलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्यास तिथले अर्थकारण विकसीत होईल. जगातील युध्दछायेचे वातावरण संपूर्ण जगाच्या आर्थिक विकासाला बाधा पोहोचवणारे आहे. जागतिक पातळीवर भारताच्या आर्थिक सक्षमतेबद्दल प्रकाशित होत असलेल्या अहवालांमध्ये भारत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. यासाठी देशातील महिलांना सक्षम करणे हा एक महत्त्वाचा उपाय म्हणून त्याकडे पाहिले, असेही डॉ. विजय केळकर यांनी सूचित केले. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर दिलीप कुंभोजकर यांनी आभार मानले.

Related Articles