‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अ‍ॅपला चांगला प्रतिसाद   

दोन दिवसांत दीडशेपेक्षा जास्त तक्रारी

पुणे : वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांची तक्रार नागरिकांनादेखील करता यावी, यासाठी पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे दोन दिवसांत दीडशेपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली?, याचा प्रतिसादही पोलिसांकडून देण्यात येत आहे.
 
वाहतूक नियम मोडणार्‍या चालकांविरोधात नागरिकांना आता थेट तक्रार करता येणार असून, त्याची पडताळणी करून वाहतूक विभागाकडून ४८ तासांत कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, दोन दिवसांत या अ‍ॅप्लिकेशनवर दीडशेहून जास्त पुणेकरांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. या अ‍ॅपला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी या अ‍ॅप्लिकेशनचा अधिकाधिक वापर केल्यास वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर प्रभावीपणे कारवाई करता येणे शक्य होईल,’ असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
 
‘वाहतूककोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक पोलिसांकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिक हे बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र आणि माहिती पोलिसांकडे पाठवू शकतात. पदपथावर उभ्या असलेल्या किंवा चालविल्या जाणार्‍या वाहनांची माहिती, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाइल वापरणे, फॅन्सी वाहन क्रमांक, काळी फिल्म लावलेल्या मोटारी अशा प्रकारच्या नियमभंगाबाबत नागरिक तक्रार करू शकतील. तक्रार मिळाल्यानंतर ४८ तासांत पडताळणी करून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

Related Articles