आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ   

मुंबई, (प्रतिनिधी) : आणीबाणीच्या कालखंडात (१९७५-७७) लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच, मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 
 
देशात २५ जून, १९७५ ते ३१ मार्च, १९७७ या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणार्‍यांना कारावास भोगावा लागला. अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ, त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी २०१८ मध्ये दरमहा मानधन देण्याचे धोरण निश्ति करण्यात आले आहे.  या मानधनात वाढ करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 
आता आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा वीस हजार व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा दहा हजार मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा दहा हजार तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस पाच हजार मानधन देण्यात येईल. हयात असलेल्या जोडीदारास मानधनासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच, आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती २ जानेवारी, २०१८ पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदारास शपथपत्र जोडून अर्ज करता येणार आहे. यासाठीची मुदत शासन निर्णय जाहीर झाल्यापासून ९० दिवसांचा राहणार आहे.
 

Related Articles