शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन   

पुणे : शासनाची मान्यता नसतानाही शाळा प्रवेशाची जाहिरात करणार्‍या पुणे जिलह्यातील अनधिकृत शाळांची यादी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात १३ अनधिकृत शाळा असून ९ इरादा पत्र प्राप्त झालेल्या पण शासनाची मान्यता नसलेल्या शाळा आहेत. तसेच शासनाची मान्यता आहे. पण मूळ जागेवर शाळा भरवल्या जात नाहीत, अशा २४ शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाची मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे. 
 
शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केले जाते. त्यानुसार यंदा पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात वाघोली येथील एसपी इंग्लिश मीडियम स्कूल आव्हाळवाडी, कलर्स स्कूल ताथवडे, न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल पेरणे, किंग्जवे पब्लिक स्कूल लोणावळा, माय स्कूल ताथवडे, ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीचे न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल बिबवेवाडी, स्वामी विवेकानंद एज्युकेशन फाउंडेशन नांदेड पुणेचे आयडियल पब्लिक स्कूल धायरी, जीवन मित्र एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी प्रशाला संजय पार्क (इंग्लिश), तकवा एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब कोंढवा खुर्द, समर्पण ख्रिश्चन ट्रस्टचे सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल कोंढवा बुद्रुक, केअर फाउंडेशन पुणेचे इमॅन्युअल पब्लिक स्कूल महंमदवाडी रोड हडपसर, यशवंत एज्युकेशन अँड मेडिकल प्रतिष्ठानचे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल शेवाळवाडी, सोलापूर रोड आणि एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनचे आयर्न वर्ड स्कूल नर्‍हे या १३ शाळांची यादी अनधिकृत शाळा म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
 
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही, अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. तसेच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील गटशिक्षणाधिकार्‍यांनी आपल्या क्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही,  याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे तातडीने या सर्व शाळा बंद कराव्यात. त्याचप्रमाणे शाळेच्या बाहेर फलक लावावा. आपल्या कार्यक्षेत्रात अधिकृत शाळा सुरू राहिल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची राहील, पालकांनी अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन संजय नाईकडे यांनी केले आहे.

Related Articles