महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला   

मध्य भारतात जोरदार पाऊस; पुढील वाटचालीला वेग 

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. तर पोषक वातावरणामुळे मान्सून वेगाने वाटचाल करत आहे. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. तसेच निम्मा देशात मान्सून दाखल झाला आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. पोषक वातावरणामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
 
नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर आरबी समुद्राचा काही भाग, गुजरात आणि ओडिसाच्या उर्वरित भागात, मध्य प्रदेशच्या बर्‍याच भागात, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या काही भागात दाखल झाला आहे. कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य बागलादेश व लगतच्या पश्चिम बंगालच्या भागावर स्थिरावले आहे. दुसरे कमी दाबाचे क्षेत्र गुजरात आणि लगतच्या भागावर स्थिरावले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. 
 
आज (बुधवारी) कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात अतिजोरदार, तर ठाणे, पालघर, मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. म्हणून या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
उद्या (गुरूवारी) रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट विभाग या ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. 
 
धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणक्ष पाऊस पडणार आहे. वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पुण्यात दोन दिवस हलका पाऊस 

पुणे आणि परिसरात मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तीन दिवस मोठा पाऊस पडल्यानंतर पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडणार आहे. मात्र जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा पावसात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मंगळवारी शहरात दुपारी हलका पाऊस झाला. त्यानंतर मात्र शहर आणि परिसरात ऊन पडले होते. 

धरण क्षेत्रात दमदार 

मागील चार दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. मागील २४ तासात चार धरणांत सुमारे एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी वाढले आहे. चार धरणांत ६.४९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. चार धरणांची टक्केवारी २२.२६ टक्के आहे. मागील वर्षी धरणांत ३.३७ टीएमसी पाणी होते. त्याची टक्केवारी १२.०१ टक्के होती. मागील तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य कायम आहे.  
 

Related Articles