दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?   

बडगुजर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) : जगातील सर्वात मोठा आणि शक्तीशाली पक्ष असल्याचा दावा करणार्‍या भाजपमध्ये कोणालाही पक्षात प्रवेश दिला जातो. आतापर्यंत ज्यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले; त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रिपदही दिले जात आहे. आता तर ज्या व्यक्तीवर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले, त्या सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेश दिला. आता भाजप दाऊदला पक्षात प्रवेश देणार का? असा उपरोधिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केला. 
 
नाशिकचे माजी महापौर सुधाकर बडगुजर यांनी काल भाजप प्रवेश केला. याच बडगुजर यांच्यावर भाजपने दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम सोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना सपकाळ यांनी भाजपवर तिखट टीका केली. कोणाला पक्षप्रवेश द्यावा, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपला राहिलेले नाही. 
 
भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीमसाठी पार्टी दिली होती, असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे त्याचे छायाचित्र विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती आणि आता मात्र त्यांनी हिंदुत्व मान्य केले, त्यांचे स्वागतच आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ उद्या दाऊदला पक्षप्रवेश देऊन त्याने हिंदुत्व मान्य केले असेच म्हणणार का?  भाजप हा ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणवतो; पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा भरणा झाला आहे. 

Related Articles