तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान   

पिंपरी : आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
 
पालखी सोहळ्याचे प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे म्हणाले, यंदाचा ३४० वा पालखी सोहळा असून संस्थानच्यावतीने सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून त्याला उजाळा देण्यात आला आहे. सोहळ्यात सहभागी होणार्‍या ५०० दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोड्या स्वतः खरेदी केल्या आहेत. देऊळ वाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. 
 
पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम
 
पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यात काकडा
पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानच्या वतीने महापूजा
पहाटे साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
सकाळी ८ ते ९ यावेळेत गाथा भजनाची सांगता
सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन
दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम
इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराज पादुकांचे दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यात आगमन
पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता सुरुवात
पालखीची सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी
 
पूर्वतयारी आणि सोयी-सुविधा...
 
मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी
संस्थान, देहू नगरपंचायतीकडून सोहळ्याची जय्यत तयारी
राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी, भाविक देहूत दाखल
त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज, इंद्रायणी नदीचा काठ वारकर्‍यांनी फुलला
भाविकांच्या स्वागतासाठी मार्गावर जागोजागी कमानी
देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानासाठी मंडपांची उभारणी
नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणा सज्ज
आरोग्य विभागाकडून चार ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू, गावातील पाण्याच्या नमुनांची तपासणी
एकूण दहा रुग्णवाहिका वारकरी, भाविकांच्या सेवेत राहणार
नगरपंचायत, आरोग्य विभागाकडून ५०० दिंड्यांना आरोग्य किटचे वाटप होणार
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गाची दुरुस्ती पूर्ण
इंद्रायणी नदीच्या घाटावर जीवरक्षकांची तैनात
गाव परिसरात सुमारे १२०० फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था
 
अवजड वाहतूक बंद
 
भाविकांच्या सुरक्षेसाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे देहूला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गुरुवारपर्यंत देहूत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच, उद्या (गुरुवारी) पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यान वाहतूक कात्रज बाह्यवळण महामार्गाने वळविण्यात आलेली आहे. गावाबाहेर वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles