भीमाशंकरच्या २४८ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी   

भीमाशंकर, (वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये कुंभमेळा २०२७ वेळी होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा देण्यासाठी बनवलेल्या २४८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. मंत्री आशिष शेलार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबाजी काळे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे व समितीतील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. 
 
२०२७ मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळात वाराणसी, अयोध्या, उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठी गर्दी झालेली दिसली. त्याचप्रमाणे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भीमाशंकरसह इतर तीर्थक्षेत्री देखील गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी नव्याने काही कामे करण्याची आवश्यकता आहे. भीमाशंकर परिसर विकासासाठी सध्या सुरू असलेल्या आराखड्या बरोबरच स्वतंत्र आराखडा बनवण्यात आला आहे. 
 
निगडाळे येथे भाविक सुविधा केंद्र व वाहन तळासाठी १६३ कोटी, श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकास ९० कोटी व राजगुरुनगर कडील मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार यासाठी ३३ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. निगडाळे येथे होत असलेल्या वाहनतळावर २००० चाकी वाहने २०० मिनी बस ५ हजार दुचाकी वाहने यांच्याकरता वाहनतळ, भाविकांसाठी वेटिंग हॉल, स्नानगृह, शौचालय, लॉकर सुविधा, दुकाने निर्माण केली जाणार आहे. त्याचबरोबर भीमाशंकर बस स्थानक व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकसित यामध्ये बस स्थानकाचा पुनर्विकास, राम मंदिर व दत्त मंदिर पुनर्बांधणी, दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिल्या जाणार आहेत. तसेच राजगुरुनगर कडून नवीन मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार ट्रेकिंग वॉकिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत. 
 

Related Articles