शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?   

हेरंब कुलकर्णी

मो. ८२०८५८९१९५

शनी शिंगणापूर देवस्थानने ११४ मुस्लिम धर्मिय कर्मचारी कामावरून कमी केले आहेत. यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या दडपणाने हा निर्णय घेतला.यापूर्वी मढी येथे देवस्थानने मुस्लिम धर्मिय व्यापार्‍यांना दुकाने लावायला बंदी घालण्याची भूमिका घेतली, पण टिकली नाही. 
 
मला आश्चर्य याचे वाटते की त्या देवस्थानाने इतका अन्यायकारक निर्णय घेतल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा आहे! एकही राजकीय पक्ष त्यावर बोलत नाही. त्यांचे प्रवक्ते गप्प आहेत. विरोधी पक्षांनी तरी आक्रमक व्हावे, पण ते ही व्यक्त झाले नाहीत. फुले शाहू यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करेल, असे अजितदादा वर्धापनदिनी म्हणाले, पण देवस्थानची कृती त्यांना फुले शाहू विचारांशी विसंगत वाटत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना उगाच आपली हिंदू विरोधी प्रतिमा होण्याची भीती वाटते का? शिवसेना उद्धव ठाकरे यांना आपली हिंदुत्ववादी प्रतिमा जपायची आहे का? त्यामुळे ते बोलत नाहीत.
महाराष्ट्रात अनेक सामाजिक संघटना आहेत.त्या आंदोलन सोडाच पण पत्रक सुद्धा काढत नाहीत. इतका सन्नाटा आहे... इतके चुकीचे घडूनही सोशल मिडियावरही आक्रमक विरोध होत नाही.  असे का होते आहे...? 
 
मी ज्या जिल्ह्यात राहतोय तिथेही शांतता आहे. कदाचित तिथे एखादे आंदोलन आमच्या जिल्ह्यात होईलही पण त्यातून महाराष्ट्राच्या शांततेचे उत्तर मिळणार नाही ? अमेरिका, दिल्ली, मुंबई राजकारण यावर चर्चा घडताना असे गंभीर प्रश्न दुर्लक्षित होत आहेत.
 
या सन्नाट्यामुळेच अशाप्रकारे अरेरावी वाढते आहे. घटनेने चालणारे एक देवस्थान जर असे घटनाविरोधी वागत असेल आणि त्याला विरोध सामाजिक राजकीय पातळीवर होत नसेल तर उद्या यापेक्षा वाईट घडत जाईल...अशावेळी चळवळी संपत चालल्या आहेत हे तीव्रतेने अधोरेखित होते.हा निर्णय इतका धोकादायक आहे की उद्या हे सर्व देवस्थानात करण्याची मागणी होईल, हिंदू मालक असलेल्या कंपन्या,दुकाने,संस्था इथेही करण्याची मागणी होईल. आर्थिक बहिष्कार घालण्याच्या विकृतीचा हा पुढचा टप्पा आहे. आज हे धर्मावर सुरू आहे उद्या जातीवर जाईल...विशिष्ट जात नोकरीत हवी आणि नको असे होईल.
 
मशीद आणि चर्चमध्ये जर त्याच धर्माचे कर्मचारी असतात मग इथे का नको? असे विचारणार्‍यांना कॉन्व्हेन्ट शाळेत हिंदू कर्मचारी विद्यार्थी शिक्षक नसतात का? हे बघावे व दुसरा मुद्दा, हिंदू धर्माची उदार विशाल असलेला बाज संकुचित करायचा आहे का? त्यांच्या चुकीच्या गोष्टीचे अनुकरण करण्यापेक्षा  आपण तिथेही हिंदू कर्मचारी असण्यासाठी आग्रह धरणे अधिक योग्य होईल...
 
मुस्लिम धर्मातून ईश्वर प्राप्ती कशी होते? हे बघण्यासाठी सहा महिने रामकृष्ण परमहंस नमाज पडत होते..इतका उदारमतवादी आमचा वारसा आम्ही विसरून इतके संकुचित आपण का होतो आहे? मुस्लिम आणि ख्रिस्ति अनुयायी संकुचित वागत असतील तर त्यांना उदार होण्यासाठी संवाद वाढविणे हा मार्ग आहे, आपण संकुचित होणे हा मार्ग नाही.
 
आणि या आंदोलन करणार्‍यांना हिंदूंच्या वतीने बोलण्याचा अधिकार कोणी दिल? हा प्रश्न शांततेने बंधुभावाने जगत असलेल्या उदारमतवादी हिंदूनी विचारण्याची गरज आहे.
 

Related Articles