गाडे याला जामीन नाकारला   

पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकात एका प्रवासी तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी हा आदेश दिला. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २६ फेब्रुवारी रोजी एका प्रवासी तरुणीवर आरोपी गाडेने अत्याचार केला होता. घटनेनंतर फरारी झालेल्या गाडेला पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली होती. गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गाडेने या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील अजय मिसार, पीडित तरुणीची वकील श्रीया आवले यांनी गाडेच्या जामीन अर्जास विरोध केला होता. 
 
या प्रकरणाचा सखोल तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे देखील तपासात मिळाले आहेत. तसेच, विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय आणि या प्रकरणाबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला आहे. या तपासात त्याचा सहभाग निश्चित झाला असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये, असे वकील मिसार यांनी युक्तिवादात सांगितले. आरोपीने पीडित तरुणीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता, असेही वकील आवले यांनी युक्तिवादात नमूद केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गाडेचा जामीन अर्ज फेटाळला.

Related Articles